मुंबई (प्रतिनिधी) : ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. परंतु, भाजपने बोलावलेल्या ओबीसी मोर्चा समितीच्या बैठकीला पक्षातील ओबीसी नेते पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे यांनीच पाठ फिरवल्याचे पाहायला मिळाले.
एकीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असताना भाजपने ओबीसी आरक्षणाचे हत्यार उपसले आहे. मुंबईतील भाजपच्या दादर येथील पक्ष कार्यालयात ओबीसी मोर्चा समितीची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, योगेश टीळेकर आदी नेते उपस्थितीत होते. पण ओबीसी नेत्यांनीच पाठ फिरवली.
याबद्दल चंद्रकांत पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की, भाजपमध्ये राज्य कार्यकारणीची बैठक झाल्यानंतर इतर सगळ्या मोर्चांची बैठक होते. सगळ्यांनीच याला यावे असे काही नाही. योगायोगाने मी आणि देवेंद्र फडणवीस आलो. ते आमचे नेते आहेतच पण त्यांचे सगळे नेते मोर्चांच्या बैठकीला येतीलच असे काही नाही. आमची पार्टी नवीन रक्ताला वाव देणारी आहे.
यावेळी ओबीसी आरक्षणाला धक्का आम्ही लावू देणार नाही. त्यामुळे आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीने ओबीसी समाजाबद्दलची भूमिका काय ते सांगा, आमची भूमिका आहे की, ओबीसी आरक्षणाला हात लावलेला चालणार नाही’, असा थेट सवालही फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला विचारला.
आम्ही ओबीसींचे वेगळं मंत्रालय केले होते. ओबीसींकरता सध्या फक्त बोलबच्चन देत आहे. या सरकारमधील मंत्री, आमदार, ओबीसी आरक्षणाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत. हे आम्ही सहन करणार नाही. ओबीसींच्या आरक्षणाला हात लावला तर खबरदार, हे आम्ही मुळीच खपवून घेणार नाही, असा इशाराही फडणवीस यांनी दिला.