सांगलीत आज गुरुवारी (ता. 25 एप्रिल) काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. यावेळी बोलताना काँग्रेस नेते आणि आमदार विश्वजीत कदम यांनी सांगली लोकसभेच्या जागेवरून ठाकरे गटाला चांगलेच सुनावले. दरम्यान, विश्वजीत कदम यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर नाना पटोले यांनीही सांगलीच्या जागेबाबत पाळलेले मौन सोडले. आता नाना फसणार नाही आणि सांगली काँग्रेसला दृष्ट ज्यांनी लावली ती उतरल्याशिवाय राहणार नाही, असे त्यांच्याकडून यावेळी स्पष्टपणे सांगण्यात आले.

काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांनी सांगली लोकसभेच्या जागेवरून ठाकरे गटाला सुनावले आहे. सांगली लोकसभेची जागा मिळाली आहे. त्यामुळे विधानसभेत आवाज नाही करायचा, असा इशाराच त्यांच्याकडून देण्यात आला. कदमांनी या मेळाव्यातून पक्षश्रेष्ठींसमोर आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. यानंतर नाना पटोले यांनी आपल्या भाषणात म्हटले की, काँग्रेस कार्यकर्त्यांना जितका त्रास झाला, त्यापेक्षा जास्त त्रास मला सांगलीच्या जागेवरून झाला, असे सांगत आपली भावना व्यक्त केली.

त्यामुळे सांगली काँग्रेसला दृष्ट ज्यांनी लावली ती उतरल्याशिवाय राहणार नाही. एका षडयंत्रामध्ये नाना फसले गेले असून परत फसणार नाही. काँग्रेस नेते कार्यकर्त्यांना ज्या वेदना होत आहेत त्यांना भेटून न्याय देण्याचा प्रयत्न करेन, पण आता सांगलीला मशाल पेटवावी लागेल, असे सांगत त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांती समजूत काढली.
यावेळी काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीही आपले मत व्यक्त करत म्हटले की, इतर जिल्ह्यातून पाच ते सहा नावे येत असताना फक्त सांगलीतून लोकसभा उमेदवारीसाठी एकच नाव समोर आले होते. तथापि, नंतर बरेच राजकारण झाले.

आजपर्यंतच्या राजकीय इतिहासात तीन पक्षाशी आघाडी झाली. सांगलीच्या जागेबाबत राजकारण झाले याबाबत आपण जाणार नाही. सांगलीची जागा परंपरागत असून मागील वेळी असेच काही राजकारण झाले. उमेदवारी मिळाली पण चिन्ह मिळाले नाही. सांगलीबाबत काँग्रेस पक्षात कोणाचा वाद नव्हता. शेवटी शेवटी काहीतरी चुकले आहे हे मित्र पक्षाला समजले आणि मगविधानपरिषद घ्या, आमच्या कोट्यातील घ्या अशा ऑफर येऊ लागली असे चव्हाणांकडून सांगण्यात आले.