कोल्हापूर (प्रतिनिधी) : वारणानगरमध्ये कॅन्सरग्रस्तांसाठी सुरु केलेल्या ‘नो शेव्ह नोव्हेंबर’ मोहिमेने कॅन्सरग्रस्त कुटुंबांना मदतीचा हात दिला आहे. तर पुढील काळात या मोहिमेने व्यापक स्वरुप धारण करुन जास्तीत जास्त कॅन्सरग्रस्तांना आर्थिक मदत करावी. असे आवाहन कोडोली पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सूरज बनसोडे यांनी येथे केले.

डॉ. अभिजीत जाधव यांच्या संकल्पनेतून ‘नो शेव्ह नोव्हेंबर कॅंपेन फॉर कॅन्सर पेशंट’ उपक्रमांतर्गत वारणा कॅन्सर फौंडेशनने केलेल्या आवाहनाला दानशूरांनी चांगला प्रतिसाद दिला. या मोहिमेचे दहावे वर्ष असून मिळालेल्या रकमेतून अशोक शिंदे (रा. पारगांव), मंगल हिरवे (रा. माले) या दोन कॅन्सरग्रस्तांना सूरज बनसोडे आणि महादेव सरनाईक यांच्या हस्ते प्रत्येकी ५ हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली.

यावेळी हिम्मत कुंभार, राजेंद्र जाधव, प्रथमेश पाटील, राजकुमार जाधव, प्रविण पाटील, संदीप जाधव, राजू जमदाडे उपस्थित होते.