ठाणे : अनंत दिघे यांचे शिष्य आणि शिवसेना ठाकरे गटाचे ठाण्याचे उमेदवार राजन विचारे यांच्याविरुद्ध महायुतीत कडून उमेदवार निश्चित झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू आणि आमदार नरेश मस्के यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. दरम्यान, काल झालेल्या बैठकीत अंतिम निर्णय झाला आहे.

ठाणे लोकसभेसंदर्भात मुख्यमंत्री शिंदेंच्या निवासस्थानी काही प्रमुख नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत अंतीम निर्णय झाल्याची माहिती मिळाली आहे. या वेळी मुख्यमंत्र्याच्या घरी नरेश म्हस्के, प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक, मीनाक्षी शिंदे यांच्यासोबत बैठक पार पडली . यानंतर उमेदवार निवडण्याचा सर्वाधिकार मुख्यमंत्र्यांना देण्यात आला आहे. उमेदवार कोणी असो सर्व ताकद लावली जाणार असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी सर्वांनी दिले , त्यानंतर नरेश म्हस्के यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

ठाणे लोकसभेसाठी अनेक नावांची चर्चा सुरुवातीपासून होत आहे. प्रताप सरनाईक, मिनाक्षी शिंदे अशी अनेक नावे समोर आली आहे. भाजपकडून देखील संजय केळकरांचे नाव चर्चेत होते. या जागेसाठी एकनाथ शिंदेंनी अनेक बैठका घेतल्या. अखेर ठाण्याचा बालेकिल्ला आपल्याकडे ठेवण्यात एकनाथ शिंदेंना यश मिळाले आहे. भाजपचा आग्रह मोडत एकनाथ शिंदेंनी ही जागा आपल्याकडे ठेवली आहे.

नगरसेवक ते खासदारकीचे तिकीट
नरेश म्हस्के यांनी एकनाथ शिंदेंना पहिल्या दिवसापासून पाठिंबा दिला होता. शिवसेनेतून सर्वात पहिली हकालपट्टी ही नरेश म्हस्केंची करण्यात आली होती.त्यामुळे त्यांच्या एकनिष्ठेचे फळ एकनाथ शिंदेंनी दिले आहे. नरेश म्हस्के हे गेल्या अनेक वर्षापासून ठाणे महानगरपालिकेत नगरसेवक होते. त्यानंतर ते सभागृह नेता होते. ते ठाण्याचे महापौर देखील होते.