कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील कोरोनाच्या परिस्थितीवर २ दिवसांपूर्वी मी माझे मत मांडले. त्यावर आपण दिलेली प्रतिक्रिया पाहिली. तुम्ही म्हणताय ‘गोकुळच्या निवडणूक प्रचारात अमल महाडिक सुद्धा होते. तर त्यांच्यावरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायला पाहिजे’ याचाच अर्थ असा होतो की, ती निवडणूक लादणे चुकीचे होते आणि त्यासाठी तुम्ही गुन्ह्याला पात्र आहात हे मान्य करत आहात, अश्या आशयाची पोस्ट माजी आमदार अमल महाडिक यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर टाकली आहे.

यामध्ये त्यांनी पुढीलप्रमाणे मत मांडले आहे – ज्या कोल्हापूर जिल्ह्यात सर्व ठिकाणी तुमची सत्ता आहे त्या आपल्या जिल्ह्याचा मृत्युदर देशात सर्वाधिक आहे. कोरोना वाढत असताना दुसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर गोकुळ निवडणुका नकोत अशी भूमिका आम्ही सुरुवातीपासून घेतली होती. तरी आपण व आपले सहकारी निवडणुकीसाठी आग्रही राहिलात. या सगळ्यात आरोग्य व्यवस्थेकडे दुर्लक्ष करून लोकांच्या जीवांचे खेळ मांडले आणि आता असंवेदनशीलतेचे दर्शन घडवत दुसऱ्याकडे बोट कशासाठी दाखवता ? अगदी सर्वोच्च न्यायालयापर्यंत आमचा विरोध असताना निवडणूक घेण्यासाठी प्रयत्न करणारे कोण होते, हे जिल्ह्यातील जनता जाणून आहे. साहेब, या सत्ता येतील-जातील, पण या सगळ्या खेळामध्ये माझ्या ४ सहकाऱ्यांना त्यांचा जीव गमवावा लागला याचे दुःख मोठे आहे. याची नुकसानभरपाई कधीच होऊ शकत नाही.

लोकांच्या जिवाच्या होणाऱ्या हेळसांडीला जबाबदार असणाऱ्या तुमच्या प्रशासनाचे टास्क फोर्सने नुकतेच वाभाडे काढले. अगदी आजच स्वतः आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीसुद्धा एका मुलाखतीमध्ये या कोरोनाविरोधी लढ्यातील अपयश मान्य केले. जिल्ह्यात रोज मोठ्या संख्येने लोक बाधित होत आहेत. मृत्युदर रोखण्यात तुमचं प्रशासन अपयशी ठरत आहे. अश्या काळात लोकांना दिलासा द्यायचा, त्रुटी दुरुस्त करायच्या हे सगळं सोडून आपण मीडिया समोर येवून आपली बाजू झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहात. हे सर्व जिल्ह्यातील जनता पाहते आहे. तुमचं राजकारण त्यांच्या जीवावर बेतत आहे याचा कृपा करून विसर पडू देऊ नका.

आपल्या बहिण श्रीमती हिबजाबी मुजावर यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे वृत्त काल समजले. मीसुद्धा माझ्या घरातल्या व्यक्तींना या कोरोनामध्ये गमावलं आहे. जिल्ह्यामध्ये रोज असे कोणाचेतरी भाऊ, बहीण, आई, वडील मृत्युमुखी पडत आहेत. ५०/६० लोकांचा रोज जीव जातोय आणि तरीसुद्धा आपण याकडे गांभीर्याने पाहायला तयार नाही याचं खरंतर आश्चर्य वाटतय. जर इतक्या मृत्यूचं ओझं डोक्यावर घेऊन राजकारण करायचं असेल तर अश्या राजकारणाचा धिक्कार आहे. आपण ज्येष्ठ व समजूतदार आहात. तेव्हा साहेब, थोड्या वेळासाठी राजकारण बाजूला ठेऊन आजच्या या परिस्थितीला कोण जबाबदार आहे याचा आपण खरंच शांतपणे विचार करावा, एवढीच विनंती !

अमल महाडिक यांच्या पोस्टची लिंक –

https://www.facebook.com/1482256838693087/posts/2803080983277326/