मुंबई ( प्रतिनिधी ) गेले काही दिवस आरक्षणावरुन राज्यात सकल मराठा समाजात संतापाची लाट आहे. राज्यात अनेक ठिकाणी साखळी उपोषणे सुरु आहेत. तर अनेक जिल्ह्यात सकल मराठा समाजाने खासदार आमदारांना घेराव घालत जाब विचारण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचा शेलक्या शब्दात समाचार घेतला आहे.


शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामनामध्ये याबाबत वृत्त प्रसिद्ध झालं आहे. त्यानुसार राज्याच्या दोन उपमुख्यमंत्र्यांपैकी एक उपमुख्यमंत्री हे काडीखोर असल्याचे विधान मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी केले होते. खरं तर महाराष्ट्रातील ‘एक फुल आणि दोन हाफ’ हेच काडीखोर आहेत, आणि त्यांनीच महाराष्ट्र पेटवला आहे, अशा शब्दात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे.

एक फुल आणि दोन हाफ काडीखोरांना राज्यातील प्रश्नांवरून लक्ष विचलित करण्यासाठी, हा प्रश्न चिघळत असल्याचा आरोप ही राऊत यांनी केला आहे.
महाराष्ट्रातही इंटरनेट बंद केले जाऊ लागले असून, याचा अर्थ कायदा आणि सुव्यवस्था नियंत्रणात राहिलेली नाही असा होतो असे राऊत यांनी म्हटले. तसेच मराठा आरक्षणाच्या मुद्दावरून बोलावलेल्या बैठकीला शिवसेनेला (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ही न बोलावल्याने खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला.