बीड (प्रतिनिधी) : खा. संभाजीराजे छत्रपती बीड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्याची क्षेत्राची पाहणी करीत आहेत. यादरम्यान नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावरुन थेट बॅंक अधिकाऱ्यांना सुनावले. सिबील वगैरे गेले खड्ड्यात, ते काय करायचे आपण ठरवा, आधी शेतकऱ्यांना कर्ज कधी ते बोला, अशा शब्दांत त्यांनी कुंभारवाडीतील ग्रामस्थांना कर्ज देण्यावरून टोलवाटोलवी करणाऱ्या बँक अधिकाऱ्यांना मोबाईलवरून झापले.
खा. संभाजीराजे बँक अधिकाऱ्यास म्हणाले की, मला एक सांगा, मी आता कुंभारवाडीत आहे. कुठेतरी ऑफिसमध्ये बसलोय, असे नाही. येथील सगळ्या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की तुम्ही त्यांना कर्ज देत नाही. अतिवृष्टीने शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यांना कर्ज द्यायला हवे. त्यांना तुमच्याकडे पाठवतो. त्यांच्याकडून जर व्यवस्थित रिपोर्ट आला नाही, तर मी स्वतः बँकेत येऊन बसणार. सिबील वगैरे गेले खड्ड्यात, ते काय करायचे आपण ठरवा. अशावेळी तुमचे अधिकार वापरा.