कोल्हापूर ( प्रतिनिधी ) सारथीने काढलेल्या जाहिरातीमध्ये आधिछात्रवृती धारकांच्या संख्येबाबत कोणताही उल्लेख नसल्याने केवळ 200 विद्यार्थ्यांनाच शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय सरकारला घेता येणार नाही. असे आमदार सतेज पाटील म्हटले आहे.

राज्य सरकारच्या छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेकडून (सारथी) मराठा समाजातील पीएच.डी करणारे 1400 विद्यार्थी पात्र असताना केवळ 200 संशोधक विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हा आमच्यावर अन्याय असून ही फेलोशिप सरसकट द्यावी या मागणीसाठी कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यातील विद्यार्थी 30 ऑक्टोबर पासून साखळी उपोषणाला बसले आहेत. या विद्यार्थ्यांना आमदार सतेज पाटील यांनी भेट दिली.

मात्र, सारथीच्या मुख्य कार्यालयातील प्रशासनाने या उपोषणाकडे दुर्लक्ष केले आहे. या पार्श्वभूमीवर आज आमदार सतेज पाटील यांनी गुरुवारी या विद्यार्थ्यांची भेट घेवून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी सारथीच्या माध्यमातून पी.एच.डी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्तीचा प्रश्न मुख्यमंत्र्यांचा कानावर घालणार असून त्यासाठी लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याची ग्वाही दिली.

आमदार पाटील यांचा फोन अन् मंत्रालयातील यंत्रणेपर्यंत पोहचल्या विद्यार्थ्यांच्या वेदना आमच्या मागण्या प्रशासनापर्यंत पोहचत नसल्याची खंत विद्यार्थ्यांमधून व्यक्त होत होती. आमदार पाटील यांच्या सूचनेनंतर मंत्रालयातील नियोजन विभागातून या विद्यार्थ्यांच्या समस्येची माहिती कुलकर्णी यांच्याकडून तत्काळ मागविण्यात आली.