नागपूर ( प्रतिनिधी ) महाराष्ट्र राज्याच्या रोजगार निर्मितीत यंत्रमागधारकांचे मोठे योगदान आहे. यानुषंगाने राज्यातील यंत्रमाग व्यवसायाला चालना देण्यासाठी स्वतंत्र अभ्यास गट स्थापन केला जाणार असल्याची घोषणा आज वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत केली. यात भिवंडी, मालेगाव आणि इचलकरंजीमधील लोकप्रतिनिधी आणि यंत्रमानधारकांना समाविष्ट करून अभ्यास गट तयार केला जाईल.

यंत्रमाग व्यवसायाच्या वृद्धीसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून पुरेशी साधणे उपलब्ध करून दिली जातील. यासह मकरसंक्रांत आणि होळीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील दारिद्र्यरेषेखालील २४ लाख ५८ हजार शिधापत्रिका धारकांना यंत्रमागावर तयार झालेल्या साड्या मोफत देण्यात येणार असल्याची घोषणा पाटील यांनी आज विधानसभेत केली.

राज्यात 12 लाख 70 हजार यंत्रमाग आहेत. रोजगार निर्मितीमध्ये यंत्रमाग धारकांचे मोठे योगदान आहे. त्यांनाही सवलती मिळाल्या पाहिजेत. वस्त्रोद्योग उद्योगाचा सर्वंकष अभ्यास करून शासनाने पाच वर्षासाठीचे वस्त्रोद्योग धोरण जाहीर केले आहे. त्याच धर्तीवर  यंत्रमाग धारकांच्या समस्या सोडविण्यासाठी शासन काम करीत आहे.  अशी माहिती  वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली. 

पुढे बोलताना मंत्री पाटील म्हणाले की, अभ्यास गटामध्ये मालेगाव,  भिवंडी, विटा,  इचलकरंजी, सोलापूर येथील केंद्र ठेवण्यात येतील.  शासनाने राज्यात 24 लाख 58 हजार दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील महिलांना एक मोफत साडी देण्याचा निर्णय घेतला आहे. मकर संक्रांतीपासून ते होळी सणापर्यंत हा कार्यक्रम राबविण्यात येईल.