मुंबई ( प्रतिनिधी ) महाराष्ट्र विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे आज ७ डिसेंबर २०२३ पासून सुरु होत आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पूर्वसंध्येला चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. चहापान कार्यक्रमास रामगिरी निवासस्थान, नागपूर येथे आयोजित करण्यात आला.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमवेत सर्वश्री मंत्री, सर्वश्री आमदार उपस्थित होते.

नागपूरमधील हिवाळी अधिवेशनात विदर्भ व मराठवाड्यासह शेतकरी, कष्टकरी यांच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा करून न्याय देण्याचा प्रयत्न आहे. कायद्यात बसेल व टिकेल आणि ओबीसीसह कोणत्याही घटकांवर अन्याय होणार नाही, असे मराठा आरक्षण देण्याचा या शासनाचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे, कामगार मंत्री सुरेश खाडे, कौशल्य विकास, नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार प्रवीण दरेकर, ॲड. आशिष जायस्वाल आदी उपस्थित होते.