सोलापूर ( प्रतिनिधी ) उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत सोलापूरमधील रंगभवन जवळील वोरोनाका प्रशालेमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मिनी सरस व जिल्हास्तरीय रुक्मिणी महोत्सव प्रदर्शन व विक्री केंद्राचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

उमेदच्या माध्यमातून बचत गटातील महिलांना विविध उद्योग व्यवसायाचे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे नमूद करून त्या बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूना चांगली बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हास्तरावर मॉल निर्माण करण्यास सहकार्य करणार असल्याचे याप्रसंगी पाटील यांनी आश्वस्त केले. दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांनी उमेदच्या माध्यमातून दिनांक 19 ते 21 जानेवारी दरम्यान आयोजित या महोत्सव, प्रदर्शन व विक्री केंद्रास बहुसंख्येने भेट द्यावी असे आवाहनही याप्रसंगी केले.

पाटील पुढे म्हणाले की, बचत गटातील महिलांनी तयार केलेल्या वस्तूंची दीर्घकाळ साठवणूक होणे ही अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे अशा वस्तूंची साठवणूक करण्यासाठी कोल्ड स्टोरेज ची आवश्यकता आहे. तरी असे कोल्ड स्टोरेज निर्माण करण्यासाठी जिल्हा नियोजन समिती मधून एक कोटी सहा लाखाचा निधी उपलब्ध केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ.सुधीर ठोंबरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता ) अमोल जाधव , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संतोष नवले, गट विकास अधिकारी आनंद मिरगणे, जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चवरे आदी उपस्थित होते.