मुरगूड (प्रतिनिधी) : मागील वर्षापासून कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लागू करण्यात आल्यामुळे व्यवसाय ठप्प झाले आहेत. तरीही आम्ही मागील वर्षाचे भाडे नगरपरिषदेला अदा केले आहे. यंदा मार्चपासून आमचे व्यवसाय बंद आहेत. आमच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. याचा सहानुभूतीपूर्वक विचार करून यंदाचे आमचे गाळाभाडे आणि टॅक्स माफ करावा अशी मागणी मुरगूड नगरपरिषदेच्या गाळ्यात व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन आज (मंगळवार) नगरपरिषदेचे मुख्याधिकारी हेमंत निकम यांना देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, मुरगूडमधील नगरपरिषदेच्या इमारतीच्या गाळ्यामध्ये ज्यांचे व्यवसाय सुरू आहेत त्यांनी यापूर्वी नगरपरिषदेने ठरवून दिलेले भाडे नियमितपणे भरलेले आहे. मागील वर्षभर कोरोनामुळे उद्योग, व्यवसाय बंद होते. लॉकडाऊन असल्याने त्यांना व्यवसाय करता आलेला नाही तरीसुद्धा नैतिक जबाबदारी म्हणून २०२०-२१ सालातील सर्व भाडे नगरपरिषदेस अदा केले आहे. यंदा कोरोनाची दुसरी लाट आल्याने मार्चपासून पुन्हा व्यवसाय बंद आहेत. लॉकडाऊनमुळे व्यापारी वर्गाचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे या बंद काळातील नगरपरिषदेच्या मालकीच्या इमारतीतील गाळ्यांचे भाडे व टॅक्स माफ करावा. जिल्ह्यातील अन्य नगरपरिषदांंनी अशा माफीचा निर्णय घेतला आहे. मुरगूड नगरपरिषदेनेही हा निर्णय घ्यावा.

या निवेदनावर व्यापारी असोसिएशनचे माजी अध्यक्ष सदाशिव अंगज, आनंदराव गोरुले, राजू चव्हाण, अमर चौगले, शिवाजी वारके, सुनील मेंडके, संदीप सूर्यवंशी, सागर भोसले, कुणाल क्षीरसागर यांचेसह इतर व्यापाऱ्यांच्या सह्या आहेत.