कळे (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील हरपवडे ग्रामपंचायतीमध्ये महाराष्ट्र शासनाच्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा योजने अंतर्गत पन्हाळा तालुका कृषी विभागातील तंत्रज्ञान व्यवस्थापक आर. एस. चौगले यांनी महिलांना योजनेअंतर्गत येणाऱ्या सर्व कामांसंदर्भात मार्गदर्शन केले.

हरपवडे, निवाचीवाडी येथील बचतगटाच्या सर्व महिलांना चौगले यांनी आत्मा योजने अंतर्गत गटाची नोंदणी करणे, शेतकरी गट स्थापन करणे, महिलांना  व्यक्तिगत व बचतगटा मार्फत मिळणाऱ्या शासकीय योजना व अनुदानाची माहिती देण्यात आली. तसेच राज्याबाहेर, राज्यांतर्गत व जिल्हाअंतर्गत देण्यात येणाऱ्या तीन प्रकारच्या प्रशिक्षणाची माहिती, शेती शाळा प्रात्यक्षिके, गट स्थापना, कृषी संबंधित प्रक्रिया योजनेअंतर्गत ३५ टक्के अनुदानाची पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजना या सर्व बाबींचे मार्गदर्शन केले. तसेच महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी देशी कोंबड्यांच्या अंडी संकलन केंद्राविषयी माहिती, जिल्ह्यांतर्गत प्रशिक्षण घेण्याविषयीचे नियोजन व कृषी विभागाच्या गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना, कृषी यांत्रिकीकरण योजना, महात्मा गांधी रोजगार हमी योजना या विविध विषयांची माहिती यावेळी देण्यात आली.

यावेळी हरपवडे सरपंच दिनकर चौगले, उपसरपंच राणी सुर्यवंशी, ग्रामसेवक सागर निकम, अशोक चौगले, शिवाजी पाटील, बँक निरिक्षक – दामोदर चौगले, प्रगतशील शेतकरी दिलीप चौगले यांसह गावातील परिसरातील शेतकरी व महिला उपस्थित होत्या.