पंढरपूर ( प्रतिनिधी ) कार्तिकी एकादशी यानिमित्त आज उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते विठूरायाची शासकीय पूजा संपन्न झाली. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे उपस्थित राहून विठूरायाच्या चरणी लीन झाले. चंद्रकांत पाटील यांनी पाऊस कमी झाल्याने राज्यावरील दुष्काळाचे संकट टळावे, राज्यातील जनता सुखी, संपन्न राहो अशी प्रार्थना केली.

पंढरपूर येथे आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पूजा संपन्न झाली. यंदा नाशिक जिल्ह्याच्या दिंडोरी तालुक्यातील माळेदुमाला येथील शेतकरी श्री. बबन विठोबा घुगे व सौ. वत्सला बबन घुगे या दांपत्याची मानाचे वारकरी म्हणून निवड करण्यात आली. हे शेतकरी दाम्पत्य मागील पंधरा वर्षापासून नियमितपणे वारी करत असल्याची माहिती पाटील यांनी दिली.


यंदाच्या कार्तिकीला मंदिर संवर्धन विकासासाठी मंजूर करण्यात आलेल्या 73 कोटीच्या निधीतून पहिल्या टप्प्यातील 26 कोटीच्या विविध संवर्धन विकास कामांचे भूमिपूजन आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. सर्व विकासकामे अत्यंत वेगाने व उत्कृष्ट दर्जाचे होतील यासाठी सर्व संबंधित शासकीय यंत्रणा व संबंधित ठेकेदार यांनी काळजी घेतली पाहिजे, असे निर्देश उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.