बारामती – सध्या लोकसभा रणधुमाळी सुरु आहे. अनेक राजकीय नेते एकमेकांवर आरोप करत आहेत. अशातच जे उपमुख्यमंत्री अजित पवार माजी कृषिमंत्री शरद पवारांवर निशाणा साधण्याची एक ही संधी सोडत नाहीत ते आज चक्क त्यांची बाजू घेताना पाहायला मिळाले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांवर एक विधान केलं. त्याच्यावर अजित पवारांनी शरद पवारांची बाजु घेत चंद्रकांत पाटील यांना चांगलंच सुनावलं. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत.

काय म्हणाले,अजित पवार..?

अजित पवार म्हणाले, चंद्रकांत पाटील यांनी बारामतीमध्ये शरद पवार यांचा पराभव करण्याचे केलेले वक्तव्य हे चूक होते. त्या विधानाला काही अर्थ नव्हता, त्यामध्ये काही तथ्य नव्हते. चंद्रकांत पाटील यांचे ते विधान चूक होते, हे मी कबूल करतो, असे वक्तव्य अजित पवार यांनी केले. ते गुरुवारी शिरुरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी अजित पवार यांनी थेटपणे चंद्रकांत पाटील यांना खडे बोल सुनावले.

अजित पवार पुढे म्हणाले, शरद पवार हे बारामतीमध्ये निवडणुकीसाठी उभेच नव्हते तर साहेबांचा पराभव करण्याचा प्रश्नच येत नाही. ते निवडणुकीला उभे असते तर वेगळी गोष्ट होती. बारामतीत उभे कोण होते, सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे. पराभव होईल तो या दोघींपैकी एकीचा होईल ना? मग तरीही चंद्रकांत पाटील बारामतीत तसं का बोलून गेले माहिती नाही. नंतर आम्ही चंद्रकांतदादांना म्हणालो, तुम्ही पुण्यात काम बघा, बारामतीत काय असेल ते मी आणि आमचे कार्यकर्ते बघतील. यानंतर चंद्रकांत पाटील यांनी अवाक्षरही काढले नाही, जी व्यक्ती उभीच नव्हती त्यांचा पराभव करण्याची भाषा योग्य नव्हती. त्यामुळे चंद्रकात पाटील यांचे ते वक्तव्य चूक होते, हे मी मान्य करतो, अशी जाहीर कबुलीच अजित पवार यांनी दिली.

मात्र, अजित पवारांनी इतक्या उघडपणे चंद्रकांत पाटील यांना खडे बोल सुनावल्याने राजकीय वर्तुळात चर्चा केली जात आहे . यावर आता चंद्रकांत पाटील आणि भाजपचे इतर नेते काय बोलणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.