कागल, ( प्रतिनिधी ) – महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा; कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची जनतेशी ऋणानुबंध घट्ट आहेत. पंधरवड्याच्या परदेशी सहलीवर जातानासुद्धा जनतेकडून रजा मंजूर करून घेणारे ते आगळेवेगळे लोकप्रतिनिधी आहेत. परदेश दौऱ्यासाठीच्या या पंधरवड्याच्या रजा मंजुरीबद्दल मंत्री मुश्रीफ यांनी जनतेचे कृतज्ञतापूर्वक आभार मानले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, इटली व स्पेनच्या सहलीवर पंधरवड्यासाठी जात असलेल्या मंत्री मुश्रीफ यांनी गेल्या पंधरवड्यापासून प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व जनतेकडून पंधरवड्याची रजा मंजूर करून घेतली आहे. शुक्रवारपासून दि. १० ते २४ मंत्री मुश्रीफ परदेश दौऱ्यावर जात आहे. त्यांच्या कागलमधील घराबाहेरच्या फलकावर याबाबतचे जाहीर निवेदन केले आहे.

या फलकावर लिहिलेले आहे, चार जून रोजीच्या मतमोजणीसाठी महायुतीच्या सर्व उमेदवारांना शुभेच्छा….! पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यावेळी पंतप्रधान निश्चित होतील, याची खात्री व्यक्त केलेली आहे. दरम्यान; येणारा महिनाभर संपूर्ण देशभरात आचारसंहिता सुरू असल्यामुळे या कालावधीमध्ये मतदारसंघ, जिल्हा, राज्य व मंत्रालयामध्ये व्यक्तिगत व विकासाची कामे होत नाहीत. म्हणून; केडीसीसी बँकेच्या सर्व संचालकांनी स्वखर्चाने इटली व स्पेनचा प्रदेश दौरा आयोजित केला आहे.

वैद्यकीय सेवा सुरूच राहील…….!

या फलकावर मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हंटलेले आहे, दहा ते २४ मे या कालावधीमध्ये माझा मोबाईल सुरूच असेल. तिथली वेळ ही भारतीय वेळेच्या साडेतीन तास पुढे आहे. अत्यंत आवश्यक काम असेल तर फोन कराच. या काळात वैद्यकीय सेवा ही निरंतरपणे सुरूच असेल. त्यासाठी सकाळी कागलमधील निवासस्थान आणि मुंबईतील मंत्रालयासमोरील अ – ५ या निवासस्थानी रुग्णसेवेसाठी माणसांची व्यवस्था केलेली आहे.