कळे (प्रतिनिधी) : मोरेवाडी, ता. पन्हाळा येथे आठ दिवसापूर्वी विषारी औषध प्राशन केलेल्या विवाहितेचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. जयश्री परशराम मोरे (वय ३०) असे तिचे नाव असून, तिचा मानसिक व शारिरीक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती परशराम निवृत्ती मोरे (वय ३६), सासू सावित्री निवृत्ती मोरे (वय ६०), सासरे निवृत्ती बापू मोरे (वय ६५)  या तिघांवर कळे पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

जयश्री यांचा परशराम मोरे यांच्याशी १० वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्यांना दोन अपत्य आहेत. तेव्हापासून या तिघांच्याकडून वारंवार टोमणे मारून मानसिक त्रास सुरु होता. अखेर या त्रासास कंटाळून जयश्री यांनी सोमवार, दि.२० जून रोजी विषारी औषध सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. दरम्यान, उपचारासाठी कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरु असताना याबाबतचा जबाब स्वतः जयश्री मोरे यांनी दिला होता.