जालना ( वृत्तसंस्था ) भोकरदन जिल्हा जालना येथील मराठा आरक्षणाखेरीज राजकीय नेत्यांना गावबंदीचा फलक फाडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यावरुन मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे यांनी याबाबत आक्रमक भुमिका घेत भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि त्यांचे आमदारपुत्र संतोष दानवे यांच्या समर्थकांनी हे बोर्ड फाडल्याचे सांगितले.


याबाबत बोलताना जरांगे एकेरीवर येत म्हणाले की, गोरगरीब मराठ्य़ांच्या लेकरांसाठी लावलेला बोर्ड तू फाडलास, आता तुझा कार्यक्रम झालाच समज, मनोज जरांगे यांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून, त्यानंतर ते जालन्यातील चित्तेगाव येथे आले होते. दरम्यान गाडीच्या टपावर उभे राहून जरांगे यांनी लोकांशी संवाद साधला. आरक्षणासाठी जागे रहा, जागृत रहा, असे आवाहन त्यांनी मराठा समाजाला केले.

तसेच पुढे बोलताना म्हणाले की, भोकरदनला मराठा समाजाचे बोर्ड फाडण्याचा जो प्रकार झाला तो अत्यंत चुकीचा असून सरकारने आरोपींवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी जरांगे यांनी या वेळी केली. मराठा समाजाने लावलेले बोर्ड हे मतदानासाठी नाहीत, तर आरक्षणासाठी आहेत. यापुढे महाराष्ट्रात मराठा समाजाचा कुठलाही बोर्ड फाडला गेला तर सरकार जबाबदार. बोर्ड फाडला की महाराष्ट्रातले मराठे मागे लागलेच म्हणून समजा, असा इशाराही जरांगे यांनी दिला.