कोल्हापूर (प्रतिनिधी) : राजारामपुरीतील एका फुटवेअर कंपनीमध्ये साहित्याची परस्पर विक्री करून २ लाख ३ हजारांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी, व्यवस्थापक राजेंद्र दत्तात्रय सावंत (वय ३२ रा. हरिपूररोड, सांगली) याला राजारामपुरी पोलीसांनी अटक केली. याप्रकरणी विभागीय व्यवस्थापक पार्थ संजय महेश्वरी (वय २४ रा. मकराना, राजस्थान) यांनी फिर्याद दिली आहे. संशयित आरोपीला आज (गुरुवार) न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला ३ ऑक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, राजारामपुरी येथील पहिल्या गल्लीत मुख्य मार्गावर एका नामांकित फुटवेअर कंपनीचे शोरूम आहे. याठिकाणी संशयित राजेंद्र सावंत हा व्यवस्थापक म्हणून नोकरी करत होता. त्याने शोरूम मधून विक्री केलेली पादत्राणे तसेच इतर साहित्यांचे २ लाख ३ हजार २२ रुपयांचा गैरप्रकार केला होता. ही बाब कंपनीचे विभागीय व्यवस्थापक पार्थ महेश्वरी यांच्या निदर्शनास येताच, त्यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यांमध्ये फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी राजेंद्र सावंत याला काल रात्री उशिरा अटक केली.