मुंबई (प्रतिनिधी) : महाविकास आघाडीचा आजचा मोर्चा असफल झाला आहे. तीन पक्ष एकत्र येऊनदेखील आजची संख्या पाहता हा मोर्चा ड्रोनश़ॉट लायकदेखील नव्हता, अशी खोचक टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. महाविकास आघाडीच्या मोर्चानंतर फडणवीसांनी माध्यमांशी बोलताना मोर्चावर जोरदार टीका केली.

फडणवीस म्हणाले की, आजचा महाविकास आघाडीचा मोर्चा हा असफल मोर्चा आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी लोक आलेच नाही. विशेष म्हणजे तीन पक्ष मिळून हा विराट मोर्चा असल्याचे सांगितले जाते; परंतू तसे मुळात अजिबात नाही. हा मोर्चा अतिशय मिनी होता.

आजच्या मोर्चातरी उद्धव ठाकरे नवीन काहीतरी बोलतील अशी आशा होती; पण तसे अजिबात झालेच नाही. नेहमीप्रमाणे उद्धव ठाकरे हे ठरलेले वाक्य बोलले आहेत. उद्धव ठाकरे हे किती दिवस तेच तेच डायलॉग बोलणार आहेत. शिवराळ भाषा वापरायची म्हणजे झाले बोलणे, अशी गत ठाकरेंची झालेली आहे. त्यांनी नवीन गोष्टी पाहाव्या, नवीन रायटर ठेवावा, अशी टीका फडणवीसांनी केली आहे.

महाविकास आघाडीच्या नेत्यांना आम्ही आझाद मैदानावर मोर्चा घ्यावा, असे आवाहन केले होते. एव्हाना आम्ही त्यासाठी परवानगी देऊ इच्छित होतो; परंतु त्यांना माहीत होते की, एवढी लोकांची संख्या आपल्याकडून आणणे शक्य होणार नाही. त्यामुळे त्यांनी गल्लीबोळातून हा मोर्चा काढण्याची परवानगी घेतली. एक प्रकारे हा मोर्चा असफल झाला आहे, ड्रोन शूटिंगलायक देखील हा मोर्चा नव्हता, अशी खोचक टीका फडणवीसांनी केली आहे.