कोल्हापूर (प्रतिनिधी ) : शाहू महाराज छत्रपती आपल्याविषयी सर्वांनाच आदर आहे, पण आपले स्वयंघोषित वटमुखत्यार घेतलेल्यांचे अंतरंग आपल्याला माहित दिसत नाही. यापुढे आपण स्वतः जनतेतून निवडून येत नाही , याची पूर्ण कल्पना असल्यामुळे त्यांनी चाव्या फिरवून काँग्रेसच्या उमेदवारीची माळ आपल्या गळ्यात घातली. राजकीय सुळावर आपल्याला चढविले. या पाताळयंत्री माणसावर जरा लक्ष ठेवा , नाहीतर कधी वाड्याच्या प्रॉपर्टी कार्डवर त्यांनी आपले नाव लावून घेतले हे आपल्याला लक्षातही येणार नाही, अशी बोचरी टीका सत्यजीत उर्फ नाना कदम यांनी केली. महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते कोल्हापूर येथे बोलत होते.

कदम म्हणाले , “महाराज , हे नेते जिल्ह्यात आज आपले वटमुखत्यार म्हणून वावरत आहेत. यांचा इतिहास जरा जाणून घ्या. यांनी धनगर समाजाच्या जागेवर मेडिकल कॉलेज उभे केले आहे. देवस्थानच्या जमिनीवर हॉस्पिटल उभे केले आहे. शेतकरी संघाच्या जागेवर तारांकित हॉटेल उभे केले आहे. महापालिकेची वाहन तळासाठी आरक्षित जागा त्यांनी हॉटेलचे पार्किंग म्हणून वापरली आहे. साहेबाच्या तळ्यात वॉटर पार्क उभं केलं होतं .शेती महामंडळाची शेकडो एकर जमीन यांच्याच ताब्यात आहे. सत्तेचा उपयोग म्हणा अथवा दुरुपयोग यांच्याकडून शिकून घ्यावा.ते काही समाजसेवा फुकट करणाऱ्यापैकी नाहीत. निवडणुकीत आपल्याला केलेल्या मदतीच्या बदल्यात आपण दिलेल्या वटमुखत्यार पत्राच्या आधारावर कधीतरी हळूच वाड्याच्या प्रॉपर्टी कार्डावर त्यांनी आपले नाव लावून घेतलेले आपल्यालाही समजणार नाही. तेव्हा या वटमुखत्यारच्या हालचालीवर जरा लक्ष ठेवा. एवढीच एक हितचिंतक या नात्याने विनंती आहे , असेही सत्यजीत उर्फ नाना कदम यांनी म्हटले आहे.

निवडणूक प्रचारात कितीही सांभाळलं तरी चिखलफेक होतच राहते. अस्मितेपेक्षा प्रतिमा सांभाळणे महत्त्वाचे असल्याने महाराजांनी ती सांभाळावी, असा सल्ला ही महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते सत्यजित उर्फ नाना कदम यांनी दिला