गडहिंग्लज (प्रतिनिधी) : विरोधक नेहमी आमच्या पाचवीला पुजलेले आहेत‌. गोकुळ संघाच्या निवडणुकीत सत्ताधारी राजर्षि शाहू आघाडीच्या विरोधात विरोधकांची अभद्र युती झालेली आहे. त्यांच्या आरोपांची मी साधी दखलही घेत नाही‌. यावर मी सर्वांचा बाप असून योग्य वेळी जाहीर चौकात त्याचे प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी दिला. ते गडहिंग्लज येथे आयोजित राजर्षी शाहू आघाडीच्या ठरावधारकांच्या मेळाव्यात बोलत होते.

गोकुळ दूध संघ आम्ही साडेपाच लाख दूध उत्पादकांच्या जोरावर वैभवाच्या शिखरावर नेऊन ठेवला आहे. तीन, तेरा आणि तेवीस तारखेस दुधाचे बील चुकते करण्यास पंचवीस वर्षांत एकदाही खंड पडलेला नाही‌. कर्मचाऱ्यांचे पगार कधीच थकलेले नाहीत. हे स्वच्छ पारदर्शक कारभाराचेच द्योतक आहे. संघ उत्पादकांच्याच ताब्यात रहावा ही आमदार पी. एन पाटील, अरुण नरके यांच्या नेतृत्वाखालील राजर्षि शाहू आघाडीची स्वच्छ भूमिका आहे. चांगले उमेदवार दिले असून आमचा विजय नक्की होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, अशा विश्वास महाडिक यांनी व्यक्त केला.

माजी खासदार धनंजय महाडिक म्हणाले की, सत्य विरूध्द असत्य, निती विरुद्ध अनिती, पारदर्शकता विरुध्द भ्रष्टाचार अशी ही लढाई आहे. नफ्यातील एक्याऐंशी टक्के परतावा शेतकऱ्यांना देणारा गोकुळ हा राज्यातील एकमेव दूध संघ असून दोन मे रोजी ठरावधारक मतदारांनी ‘पतंग’ या चिन्हावर पूर्ण पॅनेलला मतदान करून विजयी करावे.

संग्रामसिंह कुपेकर यांनी सत्ताधारी आघाडीला पाठिंबा देत मनोगत व्यक्त केले‌. उमेदवार प्रकाशराव चव्हाण व सदानंद हत्तरकी यांनी आघाडीच्या संपूर्ण पॅनेलला निवडून देण्याचे आवाहन केले. माजी मंत्री भरमूआण्णा पाटील, माजी आमदार संजयबाबा घाटगे, संचालक रणजित पाटील यांची भाषणे झाली. प्रारंभी कोरोनाने निधन झालेले ठरावधारक सुभाष पाटील व राजाराम हेगाण्णा यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

मेळाव्यास एकशे ऐंशीहून अधिक ठरावधारक, शेतकरी संघाचे माजी चेअरमन वरदशंकर वरदापगोळ, अशोक पाटील, रमेश आरबोळे, बाबुराव मदकरी, ‘गोडसाखर’ संचालक किरण पाटील, किरण मोकाशी,  माजी नगरसेवक राजेंद्र तारळे, कृष्णराव वाईंगडे आदी मान्यवर उपस्थित होते‌. चंद्रकांत सावंत यांनी प्रास्ताविक, सूत्रसंचलन केले.