नवी मुंबई (प्रतिनिधी)  :  ज्येष्ठ गीतकार आणि आंबेडकरी चळवळीत सक्रीय असणारे लोककवी हरेंद्र जाधव यांचे प्रदीर्घ आजाराने  आज (रविवार) निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. त्यांना पक्षाघात  झाला होता. मागील काही वर्षांपासून ते आजारी असल्याने अंथरुणावरच होते. अखेर त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला.   

तूच सुखकर्ता तूच दु:खहर्ता,  आता तरी देवा मला पावशील का,  माझ्या नवऱ्यानं सोडलिया दारु, पाहा पाहा मंजुळा हा माझ्या भीमरायाचा मळा,  ही त्यांची गाणी लोकप्रिय झाली होती. त्यांनी  सुमारे १० हजार गाणी लिहीली आहेत.

हरेंद्र जाधव यांचा जन्म १६  फेब्रुवारी १९३३ रोजी नाशिकच्या निफाड तालुक्यातील मिग ओझर येथे झाला होता. ते शिक्षक  होते.  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरीत होऊन त्यांनी आंबेडकरी चळवळीचे काम सुरू केले होते.