धामोड (सतीश जाधव) : राधानगरी तालुक्यातील तुळशी धामणी परीसरात जिओ, एअरटेल, आयडीया, वोडाफोन आदी कंपनींचे टॉवर. पण एकाही कंपनीचे व्यवस्थित नेटवर्क नसल्याने या अनरिचेबल नेटवर्कमुळे परिसरातील नागरिकांची घरात मोबाईल असून देखील ‘असून अडचण आणि नसून खोळंबा’ अशी अवस्था झाली आहे. शिवाय ऑनलाईन शिक्षण पध्दतीने शालेय विद्यार्थ्यांना आणि अधिकारी वर्गात शासकीय कामे करणे अवघड होत आहे. या संदर्भात लाईव्ह मराठीने ६ जुलै रोजी ‘तुळशी-धामणी परिसरात नेटवर्क चा बोजवारा’ ही बातमी प्रसिद्ध केली होती.
याची दखल घेवून राशिवडे बुद्रुकचे माजी सरपंच सागर धुंदरे यांनी खासदार संभाजीराजे यांच्या सहकार्याने याचा पाठपुरावा केला होता. त्याला यश आले असल्याचे त्यांनी सांगितले.
यासंदर्भात लाईव्ह मराठीशी बोलताना ते म्हणाले, तुळशी-धामणी परीसरात कोते, म्हासुर्ली, कोनोली, बावेली आणि राशिवडे असे हे जिओ कंपनीचे टॉवर मंजूर आहेत परंतु अनेक वर्षे त्यांचे काम अपूर्ण आहे. शिवाय बावेलीपासून खामकरवाडीपर्यंत या कंपनीने जमिनीतून केबल देखील ओढली आहे. तेथून पुढील काम अपूर्ण आहे. ग्राहकांची वाढती मागणी आणि धुंदरे यांच्या सततच्या पाठपुराव्याची दखल घेऊन येत्या ३ महीन्यात हे काम पुर्ण होईल, अशी माहिती जिओचे कोल्हापूर प्रभागातील अधिकारी महादेव पाटील, सचिन मिसाळ आणि कॉन्टॅक्टर आमीत पाटील यांनी सांगितले असल्याचे त्यांनी सांगितले.