कोल्हापूर (प्रतिनिधी) : आजपर्यंत ५ निवडणुका लढलो आहे. त्यापैकी एकच जिंकलो आहे. त्यामुळे चारवेळा हरलो म्हणजे मी काही संपलो नाही. जिंकणे, हरणे हा लढाईचा भाग आहे. परंतु काहीजण महाडिकमुक्त जिल्हा करण्याची भाषा करत आहेत. लढाई करायची असेल तर तत्वांची करा, महाडिकांना संपविण्याची भाषा सोडून द्या, अशा शब्दांत माजी खासदार धनंजय महाडिक यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांचे नांव न घेता निशाणा साधला. गोकुळ निवडणुकीसाठी कानडेवाडी (ता.गडहिंग्लज) येथे आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री भरमू पाटील, माजी आमदार महादेवराव महाडिक, संजय घाटगे जिल्हा बँकेचे माजी संचालक भैय्या कुपेकर उपस्थित होते.

धनंजय महाडिक म्हणाले की, आशिया खंडातील गोकुळ असा एकमेव दूध संघ आहे की, जो ८१ टक्के परतावा देत आहे. जिल्ह्यातील साडे पाच लाख दूध उत्पादकांना गोकुळचा आधार आहे.

यावेळी शिवसेनेचे संग्राम कुपेकर व बाळ कुपेकर यांनी सत्तारूढ आघाडीला पाठिंबा जाहीर केला. याबाबत बाळ कुपेकर म्हणाले की, अखेरपर्यंत आपल्याला झुलवत ठेवून विरोधी आघाडीने आपल्यावर अन्याय केला. त्यामुळेच सत्ताधाऱ्यांसोबत जाण्याचा निर्णय घेतला.

गडहिंग्लज कारखान्याचे माजी उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण, बी.एम. पाटील वाघराळीकर, कृष्णराव वाईगंडे, तानाजी पाटील, भरमाण्णा गावडा यांनी मनोगत व्यक्त केले. मेळाव्यास उमेदवार सदानंद हत्तरकी, सम्राट महाडिक, रणजितसिंह पाटील-मुरगूडकर, वसंत नंदनवाडे आदीसह ठरावधारक उपस्थित होते.