कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्हयात ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान राबविण्यात येत असून आज जिल्हा परिषद अंतर्गत स्वच्छतेची शपथ घेऊन या अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान फलकाचे अनावरण करण्यात आले.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या हस्ते ‘स्वच्छता ही सेवा अभियान’ फलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी जलजीवन मिशनच्या प्रकल्प संचालक प्रियदर्शिनी मोरे यांनी उपस्थित सर्व अधिकारी, कर्मचारी यांना स्वच्छतेची शपथ दिली. यावर्षी ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानात गावांची दृश्यमान स्वच्छता (नजरेला दिसेल अशी स्वच्छता) या संकल्पनेवर आधारित गावा-गावांमध्ये स्वच्छता मोहीम राबविली जाणार आहे. वापरा आणि फेका या सवयीमुळे कचऱ्याचे प्रश्न निर्माण झाले असून, प्रत्येकाने वैयक्तिक स्वच्छता आणि परिसर स्वच्छतेचे भान ठेवून आपल्या वर्तनामध्ये बदल केले पाहिजे, असे मत संजयसिंह चव्हाण यांनी व्यक्त केले.

उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरूण जाधव, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी विलास पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी योगेश साळे, जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी शिल्पा पाटील, बांधकाम विभागचे कार्यकारी अभियंता  सचिन सांगावकर व सर्व कर्मचारी उपस्थित होते.

स्वच्छता ही सेवा अभियान अंतर्गत कागल तालुक्यातील करनूर ग्रामपंचायत येथे  संजयसिंह चव्हाण, यांच्या प्रमुख उपस्थितीत महाश्रमदान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या महाश्रमदान कार्यक्रमामध्ये स्वच्छतचे जनजागृती उपक्रम, स्वच्छता फेरी, स्वच्छतेची शपथ असे विविध उपक्रम घेण्यात आले. प्रियदर्शिनी मोरे, गटविकास अधिकारी सुशील संसारे, ग्रा.पं. पदाधिकारी, सदस्य, शालेय विद्यार्थी यांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवून स्वच्छतेसाठी श्रमदान केले.