मुंबई (प्रतिनिधी) :  दोन वर्षांनंतर राज्यात निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा होत आहे. त्यामुळे उत्साला उधाण आले आहे. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी लोटली आहे. पहाटेच लालबागच्या राजाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली; मात्र पहिल्याच दिवशी लालबागच्या राजाच्या मंडपात राडा पाहायला मिळाला.

मुंबईतील लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली आहे. यंदा लालबागच्या राजाचा दरबार अयोध्येतील प्रभू श्री राम मंदिराच्या देखाव्याने सजला आहे. पहाटे ५ वाजता लालबागच्या राजाची विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर सकाळी ६  वाजता लालबागच्या राजाचे दर्शन गणेशभक्तांसाठी सुरु करण्यात आले.

दर्शनाला सुरुवात झाल्यानंतर पहिल्याच दिवशी लालबागच्या राज्याच्या मंडपात राडा पाहायला मिळाला. लालबाग राज्याच्या मंडपात मुखदर्शनाच्या रांगेत धक्काबुक्की झाली. मुखदर्शनाच्या रांगत भाविक आणि सुरक्षा रक्षकांमध्ये वाद झाला. महिला भाविकाकडून सुरक्षा रक्षकाला धक्काबुक्की करण्यात आली.  पोलिसांनी मध्यस्थी करत येथील परिस्थितीवर नियंत्रणात आणली. या घटनेने गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी राजाच्या मंडपात काही काळ भक्तिमय वातावरण बदलले आणि तणावाचे वातावरण पाहायला मिळाले.