कुडाळ (प्रतिनिधी) : कुडाळ तहसीलदार कार्यालयात सर्वसामान्य नागरीकांची कामे प्राधान्याने हाती घेवून ती पुर्ण केली जातील, कोणत्याही परिस्थितीत नागरीकांची ससेहोलपट होणार नाही त्यादृष्टीने आमची यंत्रणा कार्यरत राहील. अशी ग्वाही कुडाळ तहसीलदार विरसिंग वसावे यांनी दिली.

कुडाळ तहसिलदार अमोल पाठक यांची बदली पालघर तलासरी येथे झाली. त्यांच्या जागी मुंबई येथे कार्यरत असलेले तहसिलदार विरसिंग वसावे यांनी कार्यभार स्विकारला. कुडाळ तालुक्याची सर्वकक्ष माहिती मिळावी तसेच इतर काही समस्या असल्यास त्या आपल्या पर्यंत पोहोचाव्यात यासाठी त्यांनी कुडाळमधील पत्रकारांना निमंत्रित केले होते. यावेळी तालुक्यातील विविध विषयांवर चर्चा झाली.

तहसिलदार वसावे म्हणाले की,आपला तालुका नागरीकांच्या कामाबाबत अग्रेसर रहावा, यासाठी आमचे प्रामाणिक प्रयत्न आहेत. एकवेळ मोठ्या लोकांच्या कामाला थोडा विलंब राहीला तरी चालेल पण सर्वसामान्य नागरीकांची कामे प्रलंबित राहता कामा नये. आपण तालुक्यातील काही गावांना भेटी दिल्या. येथील भाग दुर्गम आहे, तरी सुध्दा निसर्ग सौदर्यांने नटलेला आहे. नागरीकांची ही आपुलकी, प्रेम निश्चितच प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी पत्रकारांनी जुना कलेक्टर बंगला (सध्या कार्यरत असलेले तलाठी कार्यालय),घोडेबाव जवळील रांगणा रेस्ट हाऊस या ब्रिटीशकालीन वास्तुचे सर्वधन कसे होईल? शाळकरी मुलांचे दाखले, रेशनकार्ड व पेन्शन योजनेची कामे वेळेत मार्गी लागावी याकडे लक्ष वेधले.

यावेळी आमच्या कामात चौथा स्तंभ म्हणुन आपणही सहकार्य करा, आवश्यक त्या सूचना करा जेणेकरून त्याचा सर्वसामान्य नागरीकांना त्याचा लाभ होईल त्या दृष्टीने प्रयत्न करा असे आवाहन श्री.वसावे यांनी केले. यावेळी श्री. वसावे यांनी उपस्थित पत्रकारांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करून यापुढे प्रत्येक महिन्यात तालुक्यातील प्रश्नांबाबत चर्चा करू अशी ग्वाही वसावे यांनी दिली.

यावेळी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसेकर, जेष्ठ पत्रकार चंद्रकांत सामंत, लाईव्ह मराठीचे प्रतिनिधी गुरुप्रसाद दळवी, रवि गावडे, प्रमोद म्हाडगुत, अजय सावंत, निलेश जोशी, विलास कुडाळकर, उपस्थित होते.