कोल्हापूर ( प्रतिनिधी ) गेले काही दिवस राज्यात मराठा आरक्षणावरुन वातावरण तापलं आहे. यानंतर आता मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे हे आंदोलनाचा तिसरा टप्पा म्हणून 17 नोव्हेंबर रोजी कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकातून पुन्हा एकदा मराठा समाज बांधवांना पुन्हा एकदा साद घालत पुढील नियोजन स्पष्ट करणार आहेत.


दरम्यान कोल्हापुरातील एका कार्यक्रमात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 17 नोव्हेंबर रोजीच एका विद्यापीठाच्या कार्यक्रमात हजेरी लावणार आहेत. त्यामुळे कोल्हापूरचं वातावरण काहीसं तापणार हे निश्चित आहे.


मिळालेल्या माहितीनुसार संजय घोडावत विद्यापीठात महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाचे वार्षिक अधिवेशन पार पडणार आहे. या अधिवेशनसाठी शरद पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. या दोन्ही नेते कार्यक्रमाला उपस्थित राहण्याबाबत सकारात्मक असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे 17 नोव्हेंबर रोजी शाब्दिक चकमक होणार असल्याची चर्चा जोरात सुरु आहे.