शारदीय नवरात्र हा हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्त्वाचा उत्सव. हिंदू धर्मात देवीची विशेष आराधना वर्षातून दोन वेळा केली जाते. नवरात्रात चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध नवमीपर्यंत व शारदीय नवरात्रात आश्विन शुद्ध नवमीपर्यंत देवीची उपासना केली जाते. शारदीय म्हणण्याचे कारण इतकेच की हे शरद ऋतूच्या प्रारंभी येते. आश्विन महिन्यात घटामध्ये देवीची स्थापना करून, दीप प्रज्वलित करून आदिशक्तीची नऊ दिवस मनोभावे पूजा करणे, म्हणजेच घटस्थापना किंवा नवरात्रोत्सव होय. हे नऊ दिवस हर्षोल्हासाने भरलेले असतात. रात्री जागरण असते, काहीकडे दांडियाही खेळला जातो. यंदा कोरोनाच्या संकटामुळे सरकारने मंडप आणि सामूहिक दांडियावर बंधने घातली आहेत, पण भाविक आपापल्या घरी हे नऊ दिवस पूर्ण उत्साहाने साजरे करू शकतात.
शारदीय नवरात्रीमध्ये आदिशक्तीच्या उपासनेचा विशेष नऊ दिवसांचा काळ उद्या (शनिवार) १७ ऑक्टोबरपासून सुरु होत आहे. पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. जाणून घ्या, देवीचा घटस्थापना विधी…
घटस्थापना मुहूर्त –
हिंदू संस्कृतीमध्ये कोणतेही काम करण्याचा एक शुभमुहूर्त असतो. त्याप्रमाणे घटस्थापनेचाही एक शुभमुहूर्त असून या वर्षी हा मुहूर्त पहिल्या दिवशी १७ ऑक्टोबर रोजी ०६:२७ पासून ते सकाळी १० वा. १३ मि. पर्यंत आहे. तर अभिजात मुहूर्त सकाळी ११:४४ पासून ते दुपारी १२:२९ पर्यंत असेल.
घटस्थापना विधी –
पूजेचे साहित्य – नवरात्रोत्सवात शेतातील काळी माती, एक पत्रावळ, पाच प्रकारचे धान्य यामध्ये गहू, साळी, इतर कडधान्य इ., कुंभ कलश, विड्याची पाने, सुपारी, छोटी नाणी, कलशाला बांधण्यासाठी दोरा, धूप-दीप, गुगुळ, कुंकू, हळद, अक्षता, गुलाल इत्यादी.
प्रतिपदेला सकाळी लवकर उठून नदी, तलाव, विहीर किंवा सोईस्कर ठिकाणी स्नान करावे. चौरंग किंवा पाटावर देवीची प्रतिमा स्थापन करून रत्नभूषण, मुक्ताहराने सुशोभित करावी. फोटो नसल्यास दुर्गायंत्राची स्थापना करावी. त्यासमोर पवित्र ठिकाणची किंवा शेतातील माती आणून वेदी (वेदी म्हणजे शेत) तयार करून त्यामध्ये पाच प्रकारचे धान्य पेरावेत. पीठ पूजेकरिता चौरंगाच्या दक्षिणेला कलश ठेवावा. त्यामध्ये तीर्थ-जल ठेवावे. एखादे रत्न किंवा सुवर्णही त्यात ठेवावे.
पूजा झाल्यानंतर देवीसमोर गायन-वादन करावे. विधिवत मंत्रोच्चाराबरोबर पूजन करावे. उत्सवात जमिनीवर झोपावे. कुमारिकांचे पूजन करावे. धर्मशास्त्रानुसार, एक किंवा दोन वर्षाची कन्या कुमारिका, तीन वर्षांची कालिका, सात वर्षांची चंडिका, आठ वर्षांची शांभवी, नऊ वर्षांची दुर्गा आणि दहा वर्षांची सुभद्रा मानली जाते. दहा वर्षांपुढील कन्येला पूजनासाठी वर्ज्य मानले आहे. नऊ दिवस उपवास करणे शक्य नसल्यास तीन दिवस उपवास करावा. भक्तिभावाने सप्तमी, अष्टमी आणि नवमीच्या रात्री भगवती पूजन केल्याने सर्व चांगले फळे मिळतात.
नवरात्रीमध्ये अखंड ज्योत लावावी, परंतु या गोष्टी लक्षात ठेवा…
नवरात्रीमध्ये देवीसमोर नऊ दिवस अखंड ज्योत लावली जाते. देवीसमोर एक तेलाची आणि एक शुद्ध तुपाची ज्योत लावावी.
तुपाचा दिवा देवीच्या उजव्या बाजूला आणि तेलाचा दिवा देवीच्या डाव्या बाजूला ठेवावा.
अखंड ज्योत संपूर्ण नऊ दिवस प्रज्वलित राहणे आवश्यक आहे. यासाठी एका छोट्या दिव्याचा उपयोग करावा. अखंड दिव्यामध्ये तेल, तूप टाकायचे असल्यास किंवा वात ठीक करायची असल्यास छोटा दिवा अखंड दिव्याच्या मदतीने प्रज्वलित करून बाजूला ठेवावा.