कोल्हापूर (प्रतिनिधी) : करवीर पोलिसांनी आज (गुरुवार) सराईत मोटारसायकल चोरट्यास शिताफीने अटक केली. मारुती गुंडू मस्कर (वय ५४, रा. सध्या उचगाव, ता. करवीर, मूळ गाव – मोरेवाडी ता. चंदगड जि कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे.

करवीर तालुक्यात मोटारसायकल चोरीच्या घटनांत वाढ झाली आहे. त्यामुळे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे व अपर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांनी मोटारसायकल चोरीच्या गुन्हयांना आळा घालणेचे दृष्टीने मार्गदर्शन केले होते. आज करवीर पोलीस गस्त घालणेस जात असताना कोल्हापुरातील परीख पूलच्या रस्त्याकडेला एक बेवारस मोटरसायकल मिळून आली. ही मोटारसायकल घेण्यासाठी मारुती मस्कर हा आला असता त्याला पोलिसांनी संशयावरून अटक केली. चौकशीअंती ही मोटारसायकल २८ जून रोजी पहाटे ०४.३० चे सुमारास कांडगाव, ता. करवीर येथून चोरल्याची कबुली मस्कर याने दिली आहे.  त्याच्यावर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक सुनील माळगे, सहा. फौजदार पांडुरंग खडके, पो. ना. सुजय दावणे, सुनील कुंभार, राम माळी, सूरज देसाई, विजयकुमार शिंदे आदींनी केली.