सिंधुदुर्ग ( प्रतिनिधी ) समाजातील विषमता दूर करण्यासाठी कार्यपालिका, न्यायपालिका आणि विधिपालिका अशा यंत्रणांनी समन्वयाने काम करणे आवश्यक आहे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचण्यासाठी सर्व यंत्रणांनी काम करण्याची आवश्यकता असल्याचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई म्हणाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड येथील दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी न्यायालय इमारत कोनशीला समारंभ आज देवगड येथे पार पडला यावेळी ते बोलत होते.

पुढे बोलताना श्री गवई म्हणाले, कोकणामध्ये पर्यटनाला मोठा वाव आहे. पर्यटनाच्या माध्यमातून कोकणचा विकास होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग चांगले काम करत असून राज्यात अनेक न्यायालयाच्या ज्या इमारती बांधण्यात आल्या आहेत त्या इमारतीचा दर्जा हा उत्तम आहे. देवगड मधील न्यायालयाच्या इमारत देखील अत्यंत सुबक आणि सुविधायुक्त असणार आहे. कोल्हापूर येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

केंद्रीय मंत्री श्री राणे म्हणाले या इमारतीच्या माध्यमातून देवगड तालुक्यातील नागरिकांना सर्व सुविधा मिळणार आहेत. पूर्वीची न्यायालयाची इमारत 1877 साली बांधण्यात आलेली होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इतर तालुक्यातील न्यायालयाच्या इमारती देखील लवकरच बांधण्यात येतील.

शालेय शिक्षण मंत्री श्री केसरकर म्हणाले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्याय विभागाची जबाबदारी स्वीकारल्यापासून राज्यात अत्यंत सुंदर आणि सुविधायुक्त न्यायालयाच्या इमारती पूर्ण झाल्या आहेत. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने कोल्हापूर येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ उभारण्याची विनंती करतो असे ते म्हणाले.

हा कार्यक्रम सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई, केंद्रीय सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, सिंधुदुर्ग जिल्हा व सत्र न्यायाधीश हेमंत गायकवाड, न्यायाधीश श्रीमती देशमुख, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन बोरकर, जिल्हाधिकारी किशोर तावडे, पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.