हिंगोली : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांच्यावर तोफ डागली. ओबीसी आरक्षणाचा इतिहास सांगतानाच मनोज जरांगे-पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. अरे जाळायला अक्कल लागत नाही, तर जुळवायला अक्कल लागते, असे म्हणत छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला. 

हिंगोलीत आज ओबीसी समाजाची एल्गार परिषद झाली. या परिषदेतून मंत्री छगन भुजबळ यांनी जोरदार टोलेबाजी करत मनोज जरांगे पाटील यांच्यावर हल्ला चढवला. आमची एकच सभा झाली. तरीही त्यांना खटकलं. ते म्हणाले, भुजबळांचं खुट्टं उपटतो. खुटं उपटायला मी काय केलं रे ? मला आलेल्या शिव्या गलिच्छ होत्या. काही चॅनलवाले त्यांना म्हटलं तुमची हिंमत असेल तर वाचा. आणि महाराष्ट्राल कळू द्या मी चॅनलवाल्यांना सांगितले. त्यांना पाच पंचवीस पानांचा मेसेज दिला. म्हणाले, आम्हाला वाचवत नाही. तुम्हाला एक शिवी वाचता येत नाही. मी आणि माझं कुटुंब दोन महिने या शिव्या वाचतो आणि ऐकतोय. आम्ही कसं जगायचं? असा सवाल छगन भुजबळ यांनी केला.

भुजबळांनी एक दगडही मारला नाही

एक दगड कधी भुजबळांनी मारला नाही. टायर तरी जाळले का? त्यांनीच बीड पेटवले. जे पेटवत आहेत. त्यांना बोला. पेटवायला अक्कल लागत नाही. पटवायला अक्कल लागते. जाळायला अक्कल लागत नाही. जुळवायला अक्कल लागते. मोडायला अक्कल लागत नाही घडवायला अक्कल लागते. काही आले नाही याचा अर्थ ते विरोधात आहे असे नाही, असे भुजबळ म्हणाले.

मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांना म्हातारा झाल्याचे म्हटले होते. त्यावरूनही भुजबळ यांनी टीका केली. भुजबळ म्हातारा झालाच ना. सर्वच म्हातारे होणार. तुझे वडीलही म्हातारे झाले असतील. तूही होशीलच. पण हे केस पिकले ना, एका आंदोलनाने पिकले नाही. जेवढे केस आहेत ना तेवढी आंदोलने या भुजबळाने केली आहेत. जीवाची पर्वा न करता आंदोलने केली आहेत. आंदोलन मला नवीन नाही, असे भुजबळ म्हणाले.