कोल्हापूर (प्रतिनिधी) : डीपीयू सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल पिंपरीच्या सहयोगाने डी. वाय. पाटील हॉस्पिटल, कदमवाडी येथे सुरु केलेल्या अवयव प्रत्यारोपण ओपीडीच्या माध्यमातून मृत्युच्या दारात असलेल्या रुग्णाला पुनर्जन्म देणे शक्य होणार आहे. असे प्रतिपादन डी वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष, आमदार सतेज डी. पाटील यांनी केले.

यावेळी डीपीयू सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल पिंपरीच्या सहयोगाने डी वाय. पाटील हॉस्पिटल कदमवाडी येथे सुरू करण्यात आलेल्या अवयव प्रत्यारोपण ओपीडीच्या शुभारंभ आ. सतेज पाटील यांच्या हस्ते झाला.

आ. सतेज पाटील म्हणाले की, आजच्या धावपळीच्या युगात विविध कारणामुळे अवयव निकामी होण्याचे व त्यामुळे जीवन धोक्यात येण्याचे प्रमाण वाढत आहे. अवयव मिळत नसल्याने दररोज 20 लोकांचा मृत्यू होतो. यातूनच आपल्या जिल्ह्यातील व आसपासच्या जिल्ह्यातील लोकांना अवयव प्रत्यारोपण सुविधा सुरु करण्याबाबत विचार सुरु झाला आणि डॉ. भाग्यश्रीताई पाटील आणि डॉ. संजय डी. पाटील यांच्या एकत्रित प्रयत्नातून ही ओपीडी आज सुरू करता आली याचा आनंद होत आहे.

कोरोनानंतरच्या काळात कोल्हापूर हे वैद्यकीय हब बनले असून या ठिकाणी अवयव प्रत्यारोपण सुविधा सुरू होणे अत्यंत गरजेचे होते. या माध्यमातून अनेक गरजवंताना उत्तम सेवा करण्याची संधी डी. वाय. पाटील ग्रुपला मिळणार असल्याचे आ. पाटील म्हणाले.

डॉ. संजय पाठारे म्हणाले, या ओपीडीच्या माध्यमातून जीवन जगण्याची दुसरी संधी रुग्णांना प्राप्त होणार आहे. डीपीयूच्या माध्यमातून सध्या किडनी, लिव्हर, कॉर्निया, हार्ट व लंग ट्रान्सप्लांट सुविधा उपलब्ध आहेत. या उपचारांसाठी कोल्हापुरातील रुग्णांना आता पुण्यात येण्याची गरज नाही. सर्व प्राथमिक तपासण्या येथेचे करणे शक्य होणार आहे. लिव्हर ट्रान्सप्लांट संपूर्णपणे रोबोटिक शस्त्रक्रिया करणारे डीपीयू हे पहिलेच हॉस्पिटल आहे.

यावेळी हृद्य प्रत्यारोपण तज्ञ व हृद्यरोग विभाग प्रमुख डॉ. अनुराग गर्ग, आंतरराष्ट्रीय कर्डीओलोजीस्ट डॉ. विवेक मनाडे, फुफ्फुस रोपण तज्ञ डॉ. राहुल केंद्रे, डी वय पाटील एज्युकेशन सोसायटी सचिव श्रीपाद धरणगुत्ती, डी वाय पाटील अभिमत विद्यापीठ कोल्हापूरचे कुलगुरू डॉ, राकेश कुमार मुदगल आदी उपस्थित होते.