कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील साधुसंतांच्या असणाऱ्या समस्यांची दखल घेत त्यांचे वेगवेगळे प्रश्न सोडवले आहेत. यासंदर्भात साधू संतांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी आज कोल्हापुरात दाखल झाले आहे. यावेळी या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. यावेळी बाळूमामाच्या नावाने चांगभलं म्हणत, लाखो लोकांचे श्रद्धास्थान असणारे संत बाळूमामा देवस्थान व राज्यभरातील बाळूमामा भक्त यांनी काळी घोंगडी व भंडारा देत मुख्यमंतत्र्यांना आशीर्वाद दिले.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी, कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील वैष्णव, शैव, लिंगायत, वारकरी, शाक्त जोतिबा भक्त परिवार, स्वामी समर्थ केंद्र, श्री जंगली महाराज संप्रदाय अशा नानाविध संप्रदाय व पंथातील ज्येष्ठांशी यावेळी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी संवाद साधला. याप्रसंगी श्रीनीलकंठ शिवाचार्य महाराज धारेश्वर, वेदांताचार्य स्वामी निर्मलानंदगिरी, योगी शितलनाथ, महास्वामी कैलास भारती, महास्वामी महादेवमहाराज, श्री जंगली महाराज संस्थानचे प्रीतमआनंद महाराज , बाळासाहेबमहाराज पाटील, स्वामी समर्थ केंद्र , गोसेवक अरुण पाटील, सामाजिक चळवळीतील विजयजी वरुडकर व संत मंडळी उपस्थित होते.