सातारा: सातारा लोकसभा लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. मात्र आता ही लढत एक वेगळ्याच प्रकरणाने चर्चेत आली आहे. शशिकांत शिंदे यांनी एपीएमसीमध्ये एफएसआय घोटाळा करून प्रशासनाचे 65 कोटींचे नुकसान केल्याचा आरोप यांच्याविरोधात करण्यात आला असून शुक्रवारी रात्री उशीरा त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचपार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शरद पवार यांनी शशिकांत शिंदे यांना अटक झाली तर त्या विरोधात आवाज उठवून संघर्ष करू, असा इशारा सत्ताधाऱ्यांना दिला आहे. ते माढा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्यासाठी आयोजित सभेत बोलत होते.

शरद पवार म्हणाले की, देशाची सत्ता नरेंद्र मोदी यांच्या हातात आहे. त्यामुळे देशाच्या संसदीय लोकशाहीवर लोकांचा विश्वास नाही. आपण अशा लोकांना सत्ता द्यायची का? याचा विचार करावा. सत्ता लोकांच्या भल्यासाठी वापरायची असते, पण हेच राज्यकर्ते सत्तेचा गैरवापर करत आहेत. विरोधात बोलणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. पंतप्रधानांवर टीका केली म्हणून दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना आत टाकले. महाराष्ट्रातही असाच प्रकार सुरू आहे. महाविकास आघाडीचे सातारा लोकसभेचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यावर गुन्हा नोंदवून त्यांना निवडणुकीतून अडविण्याचा व थांबविण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण, त्यांना अटक करण्याचा प्रयत्न केल्यास सातारा जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते या विरोधात आवाज उठवून संघर्ष करतील, असा इशारा शरद पवार यांनी दिला आहे.

कारवाईविरोधात शशिकांत शिंदे म्हणाले की, काल रात्री मला एक नोटीस आली. या नोटिशीतून कळलं की माझ्यावर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणुकीत अशा गोष्टी होत असतात, पण शरद पवारांची शप्पथ घेऊन सांगतो. अजून एक केस करा, दोन केस करा, अशा कितीही केसेस माझ्या अंगावर टाका, पण मरेपर्यंत मी शरद पवार यांची साथ सोडणार नाही. उद्या जे काय व्हायचं ते होऊ देत, पण निवडणूक अशी लढा की सर्वजण लक्षात ठेवतील, असे आवाहन शशिकांत शिंदे यांनी केले.

उदयनराजे भोसले यांच्यावर निशाणा साधताना शशिकांत शिंदे म्हणाले की, साताऱ्यात मला लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. निवडणुकीचं वातावरण चांगल झालं आहे. निवडणुकीत राज्याच्या आणि केंद्राच्या सत्तेविरोधात असलेला रोष दिसून येत आहे. आम्ही याआधी गादीचा मान राखला. तीन वेळा त्यांना खासदार केलं. मात्र इतकं असूनही छत्रपतीच्या स्मारकाच काय झालं? असा सवाल शशिकांत शिंदे यांनी उदयनराजे भोसले यांचे नाव न घेता विचारला आहे.