कोल्हापूर (प्रतिनिधी) : स्थानिक बाजारातील मिठाई दुकानांमध्ये खुल्या स्वरुपात मिळणाऱ्या प्रत्येक मिठाईसाठी वापरण्यायोग्य कालावधी (बेस्ट बिफोर तारीख) दुकानाच्या दर्शनी भागात प्रदर्शित करणे बंधनकारक आहे, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त तु. ना. शिंगाडे यांनी दिली.
प्रसिध्दी पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, आतापर्यंत केवळ पॅकबंद अन्नपदार्थांच्या पाकिटावरील लेबल वर्णनामध्ये या पदार्थाची उत्पादन तिथी आणि वापरण्यायोग्य कालावधी (बेस्ट बिफोर तारीख) छापणे बंधनकारक होते. तथापि अलीकडच्या कालावधीमध्ये मिठाई दुकानांमध्ये खुल्या स्वरुपात मिळणाऱ्या मिठाईमुळे अन्न विषबाधा होत असल्याची प्रकरणे निदर्शनास येत असल्याने खुल्या स्वरुपात मिळणाऱ्या मिठाईवर बेस्ट बिफोर तारीख असणे बंधनकारक केले आहे. याची अंमलबजावणी १ ऑक्टोबरपासून करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व मिठाई दुकानदारांनी यापुढे त्यांच्या दुकानामध्ये मिळणारी मिठाई वापरण्यायोग्य कालावधी (बेस्ट बिफोर तारीख) दर्शविणारा फलक दर्शनी भागामध्ये लावावा.