मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हाताला किरकोळ दुखापत झाली आहे. टेनिस खेळताना त्यांच्या डाव्या हाताला थोडी दुखापत झाली आहे. ही दुखापत काळजी करण्याइतकी मोठी नाही. त्यांनी तातडीने हिंदुजा हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले. त्यांच्या हाताला हेअरलाईन फ्रॅक्चर आहे. त्यामुळे त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हाताला सपोर्टर लावले आहे.

मनसे अध्यक्ष ठाकरे यांचे कला आणि क्रीडा प्रेम सर्वश्रुत आहे. स्वतःला तंदुरुस्त राखण्यासाठी त्यांनी हल्ली नियमितपणे लॉन टेनिस खेळायला सुरुवात केली आहे. टेनिसचा आनंद घेतानाचे त्यांचे फोटो समोर आले होते. शिवाजी पार्क जिमखान्यात दररोज संध्याकाळी हजेरी लावून ते लॉन टेनिस खेळाचा आनंद घेतात. त्यांच्या हाताला यापूर्वीही दुखापत झाली होती. त्यांच्या उजव्या कोपराला टेनिस एल्बोला त्रास होता. त्यावेळी त्यांनी हाताला सपोर्टर लावला होता.