वेलिंग्टन : भारत आणि न्यूझीलंडमध्ये शुक्रवारी वेलिंग्टन येथे पहिला टी-२० सामना होणार होता; पण या सामन्यावर पावसाने पाणी फिरवले आहे. पावसामुळे नाणेफेकसुद्धा होऊ शकली नाही. बराचवेळ प्रतीक्षा केल्यानंतर सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. वेलिंग्टनध्ये नाणेफेकच्या वेळी पाऊस सुरु झाला. त्यानंतर दोन्ही संघांतील खेळाडू इंडोर फुटबॉल खेळताना दिसले.

एकवेळ असे वाटत होते की, पाऊस थांबेल आणि खेळ सुरु होईल; पण पावसाने सर्वांच्या अपेक्षांवर पाणी फिरवले. पाऊस थांबणे दूर पण कमी सुद्धा झाला नाही. पावसामुळे स्टेडियमच्या बाहेर काही जागांवर पाणी भरले होते.

पहिल्या टी-२० सामन्यावर सगळ्यांचे लक्ष होते. कारण दोन्ही संघांचा प्रवास उपांत्य फेरीमध्ये संपुष्टात आला होता. न्यूझीलंडचा पाकिस्तानने पराभव केला. भारताला इंग्लंडने दहा गडी राखून पराभूत केले होते. भारताचा लाजिरवाणा पराभव झाला. त्यानंतर बोर्ड भारताच्या टी-२० संघामध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्याचा विचार करत आहे.

न्यूझीलंड विरुद्धच्या टी-२० मालिकेमध्ये रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुल या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. युवा खेळाडूंना संधी दिलीय. शुभमन गिल, उमरान मलिक, मोहम्मद सिराज, हर्षल पटेलवर सगळ्यांच्या नजरा आहेत.