नागपूर ( प्रतिनिधी ) राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेच्या विद्यमाने राज्यातील राज्यशास्त्र व लोकप्रशासन विषयांच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी “50 वा संसदीय अभ्यासवर्ग” सोमवारी आयोजित करण्यात आला होता. या अभ्यासवर्गाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नागपूरमधील विधानभवनात झाले.

राज्यातील 12 विद्यापीठातील सुमारे 100 विद्यार्थी व अधिव्याख्याते सहभागी होणार आहेत. विधानमंडळाच्या यु -ट्यूब चॅनल वरुन तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या समाज माध्यमांद्वारे या व्याख्यानांच्या प्रसारणाचा लाभ जगभरातील प्रेक्षकांना घेता येत आहे.

विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे, विधानसभा सदस्य बाळासाहेब थोरात, प्रणिती शिंदे, विधान परिषद सदस्य अभिजित वंजारी, विधिमंडळ सचिवालयाचे सचिव जितेंद्र भोळे, विधिमंडळ सचिवालयाचे सचिव विलास आठवले इ. तज्ज्ञ मान्यवरांचे अभ्यासवर्गाला मार्गदर्शन होणार आहे.

याप्रसंगी विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री अजित पवार, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.