मुंबई (प्रतिनिधी) : नाशिकमधील ठाकरे गटाचे ११ माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी आणि मनसेच्या एका शहर पदाधिकाऱ्याने शिंदे गटात प्रवेश केला. शुक्रवारी सकाळी ८ वाजता या सर्वांचा प्रवेश सोहळा वर्षा निवासस्थानी पार पडला.

शिंदे गटासह भाजपवर हल्लाबोल करत संजय राऊत मुंबईत परतले. नाशिककडे पाठ करुन मुंबईच्या दिशेने जात असताना आणि नाशिकची हद्दही सोडलेली नसताना ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकांनी मुंबईची वाट धरली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि शिंदे गटात प्रवेश केला.

ठाकरे गटातील मनपाचे विरोधी पक्षनेते, माजी स्थायी समिती सभापती, नगरसेवक यांच्यासह मनसेच्या शहर पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. ठाकरे गटाला हे खिंडार संजय राऊत माघारी फिरत असताना पडल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. संजय राऊत यांनी पंधरा दिवसांच्या अंतरावर दोनदा नाशिक दौरा करुनही पदाधिकारी आणि नगरसेवकांना रोखण्यात यश आलेले नाही. राज्यात राजकीय गणित बदलल्यानंतर नाशिकमधून पहिल्यांदाच शिंदे गटात हा प्रवेश झाल्याने शिंदे गटाची ताकद वाढणार आहे.

ठाकरे गटाचे मनपाचे विरोधी पक्षनेते अजय बोरसे, नगरसेवक सूर्यकांत लवटे, सुवर्णा मटाले, माजी स्थायी समिती सभापती आर.डी. धोंगडे, नगरसेवक ज्योती खोले, सुदाम डेमसे, जयश्री खरजुल, प्रताप मेहरोलिया, चंद्रकांत खोडे, पूनम मोगरे, राजू लवटे आणि मनसेचे सचिन भोसले यांचा पक्षप्रवेश झाला आहे.