वारणानगर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्याचे मिनीमंत्रालय म्हणून ओळख असलेल्या जिल्हा परिषदेत उद्या (सोमवार) खांदेपालट होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. उद्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीची तारीख जाहीर होणार असल्याने आता पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी जनसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष आ. डॉ .विनय कोरे यांना जिल्हा परिषदेमध्ये घेण्याचे जोरदार प्रयत्न केले जात आहे.

काही महिन्यांपूर्वी गोकुळच्या निवडणूकीत आ. विनय कोरे हे ना. सतेज पाटील आणि ना. हसन मुश्रीफ यांच्यासोबत राहिल्यामुळे गोकुळ सहजपणे काबीज करता आले होते. जिल्हा परिषदेमध्ये जनसुराज्य शक्ती पक्षाचे ६ सदस्य आहेत. या अध्यक्ष निवडीमध्ये आ. कोरे यांच्या पक्षाची भूमिकासुद्धा महत्त्वपूर्ण असणार आहे. गोकुळच्या निवडणूकीत ते ना. पाटील आणि ना. मुश्रीफ यांच्या बरोबर राहिल्याने त्याचे पडसाद आता जिल्हा परिषद निवडीमध्ये होणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

आ. विनय कोरे भाजपा सोबत राहणार की जिल्ह्यातील ना. पाटील, ना. मुश्रीफ यांना पाठिंबा देण्याची तयारी ठेवणार या भूमिकेकडे लक्ष लागून राहिले आहे जनसुराज्य शक्ती पक्ष सत्तेत सामील झालातर सभापतीपदाची संधी कोणाला मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.