गांधीनगर (प्रतिनिधी) : गांधीनगर इथल्या एका खासगी भिशी चालवणारी महिला सुरेखा सुरेश बोरकर हिने सुमारे चाळीस लाखांची भिशीची रक्कम घेऊन पोबारा केला आहे. काबाडकष्ट, धुनीभांडी करून पोटाला चिमटा देवुन जमवलेली रक्कम गेल्याने भिशीधारक सदस्य महिलांची आर्थिक कोंडी झाली आहे. दसरा-दिवाळीच्या तोंडावर ही फसगत झाल्याने परिसरात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
करवीर तालुक्यातील गांधीनगर इथल्या कोयना कॉलनीत सुरेखा सुरेश बोरकर (वय ६२, रा. कोते ता. राधानगरी) ही गांधीनगर इथे कोयना कॉलनी मध्ये किराणा मालाचे दुकान चालवत होती. त्यातून अनेक महिलांची तिच्याबरोबर ओळख झाली. या दुकानांमध्ये महिलांची गर्दी वाढू लागली. त्यातून संबंधित महिलेने भिशी सुरू केली. पण गेली २ वर्षे झाली भिशीचे पैसे वेळेवर मिळत नाहीत. तसेच मागील ७ दिवसांपासून ही महिला गायब आहे. त्यामुळे फसगत झाल्याच लक्षात येताच महीलांनी फिर्याद नोंदवण्यासाठी गांधीनगर पोलीस ठाणे गाठले. त्यामध्ये सुमारे तीनशे महिला सभासद असल्याची माहिती पोलीस ठाण्यात जमलेल्या महिलांकडून समजली. संपूर्ण वर्षाची काबाडकष्ट करून जमा केलेली पुंजी हडप झाल्याने फसगत झालेल्या भिशी सदस्य महिला आर्थिक अरिष्टात सापडल्या आहेत. संबंधित भिशी चालक महिलेने बचत गट चालवते, असे सांगून महिलांकडून रक्कम जमा केली होती. पाच हजारापासून लाख दीड लाख रुपयांची रक्कम संबंधित भिशी चालक महिलेकडे महिलांनी जमा केली होती. ४० लाख रुपयांची फसवणूक झाल्याची चर्चा जरी सुरू असली, तरी हा आकडा आणखी मोठा असल्याची शक्यता आहे. यावेळी जमलेल्या सर्व महिलांच्या डोळ्यांमध्ये अश्रुंची धारा लागल्या होती.
संबधीत रक्कम हडप केलेली महिला आरोग्य विभागातून निवृत्त झाल्यानंतर हे उद्योग केल्याची चर्चा सुरु होती. गांधीनगर शहरात खाजगी सावकारी फोफावली असून काही दिवसांपूर्वी एका व्यापाऱ्यावर भिसी प्रकरणी कारवाई झाली होती. पण सभासदांना न्याय मिळाला नाही. या घटनेची नोंद गांधीनगर पोलिसात झाली आहे.