कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रमाणामुळे राज्यात १४ एप्रिलपासून कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. आता हे कडक निर्बंध १५ मे पर्यंत सुरू राहणार आहेत. यापूर्वी राज्य शासनाने ३१ मार्च रोजी निराधार नागरिकांना संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत लवकरच अनुदान वाटप करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार इचलकरंजीतील कष्टकरी व हातावर पोट असलेल्या नागरिकांना अनुदान वाटपास सुरुवात झाली असल्याची माहिती संजय गांधी निराधार समिती, इचलकरंजीचे अध्यक्ष राहुल खंजिरे यांनी सांगितले.

खंजिरे यांनी सांगितले की, शासनाने ३१ मार्च रोजी जाहीर केले होते की, संजय गांधी निराधार योजनेंंतर्गत अनुदान वाटप करण्यात येणार आहे. या वेळी थकीत अनुदानासाठी पालकमंत्र्यांकडे वारंवार पाठपुरावा करून ते देण्यात यावे अशा स्वरूपाची मागणी त्यांना करण्यात आली होती. यावर पालकमंत्र्यांनी आदेश निर्गमित केले होते की मागील थकीत अनुदान वाटपाचे नियोजन करण्यात यावे व अनुदान देण्यात यावे. कोरोना महामारीचा संसर्ग लक्षात घेता २१,००० लाभार्थ्यांना अंदाजे आठ कोटी रुपये वाटप करण्याचे होते. इचलकरंजीतील हातावर पोट असलेल्या नागरिकांना या अनुदानाची अत्यंत गरज होती. त्यामुळे तहसीलदार तथा पालिकेचे मुख्यधिकारी शरद पाटील, तसेच कमिटीमधील सदस्यांकडून योग्य प्रकारे नियोजन करण्यात आले होते.

कोरोनाचा धोका लक्षात घेता बँकेमध्ये गर्दी टाळावी यासाठी इचलकरंजी येथील गावभाग शाखा, इंडस्ट्रियल इस्टेटमधील कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक, वेध भवनला २०० व कल्याण केंद्र येथे २०० टोकन हे सोशल डिस्टन्सिंगचे पालन पाळून लाभार्थ्यांना देण्यात येत आहेत. पुढील ५० दिवसांकरिता ही व्यवस्था केली आहे.