कोल्हापूर (विशेष प्रतिनिधी) : विधान परिषदेची निवडणूक माजी आमदार अमल महाडिक यांनी अपक्ष म्हणून लढवली असती. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने वेगळा विचार केला असता. महाविकास आघाडीतून बाहेर पडलेलो नाही. त्यामुळेच आम्ही महाविकास आघाडीला पाठिंबा दिल्याचे संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी ‘लाईव्ह मराठी’शी बोलताना सांगितले.

एकीकडे महाविकास आघाडी विरुद्ध अनेकवेळा शेट्टी यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे त्यांची या निवडणुकीत नेमकी काय भूमिका रहाणार याबद्दल उत्सुकता होती. मात्र महाविकास आघाडीच्या व्यासपीठावर जाऊन त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार विद्यमान मंत्री सतेज पाटील यांना पाठिंबा जाहीर केला. यावेळीही त्यांनी आघाडीच्या नेत्यांबद्दल महापूर नुकसानभरपाई वरून नाराजी व्यक्त केली.

आघाडीवर थेटपणे वारंवार टीकाटिप्पणी करून पाठिंबा देण्यामागची नेमकी भूमिका ? काही अटी- शर्ती घातल्या आहेत का, अशी विचारणा माजी खासदार राजू शेट्टी यांच्याकडे केली.  त्यावेळी ते म्हणाले, मी जनतेसाठी आघाडीच्या कारभारावर टीका केली. वेळप्रसंगी यापुढेही करेन. आम्ही अजून आघाडी सोडलेली नाही. जिल्हा परिषद, शिरोळ नगरपालिकेत आम्ही महाआघाडीबरोबर आहोत. सदस्यांशी बोलून पाठिंब्याचा निर्णय घेतला. तटस्थ रहाणे शक्य नव्हते.

महाडिक यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली असती, तर मात्र आम्ही वेगळा विचार केला असता. त्यामुळेच पाठिंब्याचा निर्णय घेण्यास विलंब झाला. भाजपबरोबर जाणे आता शक्य नाही. पाठिंब्यासाठी कोणत्याही अटी- शर्ती घातलेल्या नाहीत, असेही शेट्टी यांनी स्पष्ट केले.