मुंबई (प्रतिनिधी) : पवईच्या साकी विहार रस्त्यावरील लार्सन एंड टूब्रो कंपनीच्या समोर असलेल्या साई ऑटो हुंडाईच्या सर्व्हिस सेंटरला लागलेल्या आगीत कोट्यवधींच्या गाड्या जळून खाक झाल्या. ही घटना आज (गुरूवार) घडली. ही आग इतकी भीषण आहे की, शोरूममधून मोठे, मोठे आवाज येत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

घटनास्थळी अग्निशमन दलाचे ५ बंब दाखल झाले आहेत. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. परिसरात मोठ्या प्रमाणात धूर पसरत आहे. मोठा स्फोट झाल्यानंतर ही आग लागली. हा स्फोट इतका मोठा होता की आजूबाजूचा परिसर दणाणून गेला. तसेच या ठिकाणी अनेक कामगारदेखील काम करत होते.

येथे गाड्यांचे शोरूम देखील आहे. त्यामुळे अनेक महागड्या गाड्या या ठिकाणी होत्या. त्यातच या गाड्यांमध्ये असलेल्या इंधनामुळे आगीचा भडका उडाल्याचाही अंदाज वर्तवला जात आहे. काम करणारे कामगार येथे अडकल्याची भीती वर्तवली जात आहे. वाहतूक कोंडीमुळे अग्निशमन दलाला मार्ग काढत आगीच्या घटनास्थळावर पोहचण्यात अडथळे येत आहे.