कोल्हापूर (प्रतिनिधी) : पुणे पदवीधर मदरासंघाच्या निवडणुकीसाठी भाजपकडून कडेपूरचे संग्रामसिंह देशमुख यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून कुंडलचे अरुण लाड यांना उमेदवारी जाहीर केली. दोन्ही उमेदवार सांगली जिल्ह्यातीलच आहेत.  देशमुख यांच्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि लाड यांच्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागेल.

पदवीधरसाठी अनेकजण इच्छुक होते. पण उमेदवारांच्या निश्चितीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांचीच भूमिका महत्वाची ठरली. आमदार पाटील यांनी कडेपूरचे संग्रामसिंह देशमुख यांना पसंती दिली. मंत्री जयंत पाटील यांनी कुंडलचे अरुण लाड यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. पदवीधर मतदार संघ पाच जिल्ह्यांमध्ये विस्तारला असला तरी, उमेदवार एकाच जिल्ह्यातील आणि एकाच विधानसभा मतदार संघातील असल्याने सांगलीचे राजकीय वातावरण आतापासून चांगलेच तापले आहे.

अरुण लाड यांनी गेल्या निवडणुकीत बंडखोरी करून १६ हजार मते मिळवली होती. बंडखोरीनंतरही राष्ट्रवादीसोबत सलोख्याचे संबंध आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी असलेल्या जवळीकीमुळे त्यांना उमेदवारी मिळाली. संग्रामसिंह देशमुख यांचे घराणे नेहमीच कॉँग्रेसचे दिवंगत नेते पतंगराव कदम यांच्या विरोधात उभे ठाकले. मात्र आघाडीमुळे त्यांना कधीच पलूस-कडेगाव मतदार संघातून उमेदवारी मिळाली नाही. त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत २०१४ मध्ये भाजपात प्रवेश केला. भाजपकडून जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषविले. सध्या ते सांगली जिल्हा बँकेत उपाध्यक्ष आहेत.