मुंबई (प्रतिनिधी) : मागील सलग तीन वर्षांपासून तोट्यात असलेल्या लक्ष्मी विलास बँकेवर अखेर रिझर्व्ह बँकेने निर्बंध लागू केले आहेत. रिझव्‍‌र्ह बँकेने बँकेच्या ठेवीदारांना १६ डिसेंबरपर्यंत अत्यावश्यक म्हणून २५ हजार रुपये काढण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे बँकेचे ठेवीदार, ग्राहकांत खळबळ उडाली आहे. मंगळवारी सायंकाळी रिझर्व्ह बँकेने याबाबत आदेश जारी केला. या बँकेच्या शाखा मुंबई, नवी मुंबई, पुणे, कोल्हापूर जिल्ह्यातही शाखा आहेत.

मागील तीन वर्षे लक्ष्मी विलास बँकेला मोठ्या प्रमाणावर तोटा झाला आहे. अवाजवी कर्जवाटप, अनियमितता यामुळे बँक आर्थिक संकटात आहे. तीन वर्षांपासून अकाऊंट बुक्सही कमकुवत आहेत. त्यामुळे ही कारवाई करणे भाग पडल्याचे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले.

लक्ष्मी विलास बँकेनंतर रिझर्व्ह बँकेनं जालना जिल्ह्यातील मंथा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेवर हे निर्बंध घालण्यात आले आहेत. रिझर्व्ह बँकेनं या बँकेला काही निर्देश दिले आहेत. हे निर्देश १७ नोव्हेंबर २०२० ला बँक बंद होण्यापासून पुढील सहा महिन्यांसाठी लागू राहणार आहे. मंथा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेला रिझर्व्ह बँकेच्या परवानगीशिवाय कोणत्याही व्यक्तीला कर्ज देता येणार नाही. याव्यतिरिक्त जुन्या कर्जाचं नुतनीकरण अथवा बँकेला गुंतवणूक करण्यास मनाई असेल.