अकोला (प्रतिनिधी) : अकोला जिल्ह्यात पोलीस कर्मचाऱ्यांना हेल्मेट सक्ती करण्यात आली होती. त्यानंतर आता जिल्ह्यातील सर्व दुचाकी चालकांनासुद्धा हेल्मेटसक्तीचा निर्णय पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी घेतला आहे.

येत्या शुक्रवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. विना हेल्मेट दुचाकी चालविणाऱ्यांवर शहर वाहतूक शाखा दंडात्मक कारवाई करणार असल्याचे शहर वाहतूक निरीक्षक गजानन शेळके यांनी सांगितले. अकोला जिल्ह्यात दरवर्षी होणाऱ्या अपघातात नागरिकांचा हकनाक बळी जातो. त्यापैकी 80 टक्के मृत्यू हे डोक्यावर जबर दुखापत लागल्यानेच होत असल्याचे दिसून येते.

सर्वसामान्य दुचाकी चालविणाऱ्या नागरिकांनी दुचाकी चालविताना हेल्मेट परिधान करावे, विना हेल्मेट चालकांवर येत्या शुक्रवारपासून शहर वाहतूक शाखा व जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन दंडात्मक कारवाई सुरू करणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी दिली असून सर्व नागरिकांनी दुचाकी चालविताना हेल्मेट परिधान करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.