मुंबई (प्रतिनिधी) : अहमदनगरमधील भाजपचे खासदार सुजय विखे यांनी आपल्याला काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडून तिकीट नाकारण्यासंबंधी एक गौप्यस्फोट केला आहे. हेलिकॉप्टर या एकमेव कारणामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने माझे लोकसभेला तिकीट कापले, असा दावा सुजय विखे यांनी नगरमध्ये सभेत बोलताना केला आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी देण्याअगोदर शरद पवार यांनी तू आताच जर हेलिकॉप्टरमधून फिरत असशील, तर निवडून कसा येणार? असा प्रश्न मला विचारला होता. नंतर आघाडीने मला तिकीट नाकारले आणि त्यानंतर जे काही झालं ते सगळं आपल्यासमोर आहे, असे सुजय विखे म्हणाले.
पुढे सुजय विखे म्हणाले की, हेलिकॉप्टरमुळे कोणाला फायदा झाला असेल माहिती नाही, पण माझे नुकसान झाले. पण त्यावेळी नुकसान वाटत असले तरी आता त्याचे फायदे दिसत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात काम करण्याचा आपल्याला अभिमान वाटतो, असेही त्यांनी म्हटले आहे.